Jagtik Pustak Din | World Book Day | जागतिक पुस्तक दिन | 2025

जागतिक दर्जाचे इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस 23 एप्रिल हा आहे. साहित्याच्या जोरावर गेली चारशे-साडेचारशे वर्षे जगावर अधिराज्य गाजवणारा हा साहित्यिक माणूस. त्यांची आठवण म्हणून आजचा दिवस आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो.

World Book Day 2025 | Jagtik Pustak Din | जागतिक पुस्तक दिन
World Book Day 2025 | Jagtik Pustak Din | जागतिक पुस्तक दिन

World Book Day 2025 | Jagtik Pustak Din | जागतिक पुस्तक दिन

मनुष्य हादेखील एक पशूच आहे. परंतु त्याचा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो पुस्तकांमधून जातो. म्हणूनच पुस्तकं ही मानवी जीवनाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जातात. पुस्तकं वाचायची असतात. पुस्तकं अनुभवायची असतात, पुस्तकं आपल्या आत मुरवायची असतात, रूजवायची असतात. लोकांना सुसंस्कृत आणि नीतीवादी बनवायचं असेल तर त्यांनी उत्तम पुस्तकं वाचायला हवीत. कारण उत्तम ग्रंथांच्या वाचनाने आपण उत्तम आणि चारित्र्यवान असा नागरिक म्हणून घडत जातो.


पुस्तके केवळ ज्ञान आणि माहिती देतात एवढेच नव्हे, तर पुस्तके आपल्याला संवेदनशील बनवतात, सुखदुःखाकडे निरपेक्ष भावनेने बघायला शिकवतात, पुस्तकं आपल्या बुद्धीचा आणि अनुभवाचा आवाका वाढवतात. एक प्रकारचं आत्मभान जागं करतात, आपला आत्मविश्वास वाढवतात. आपल्याला हजरजबाबी बनवतात. पुस्तकं मानवी मनाला संवेदनशील बनवतात. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आपल्यात निर्माण करतात. पुस्तकं आपल्या आत काय दडलंय याचा आपल्यालाच शोध लावून देतात!


एक पुस्तक म्हणजे एखाद्या लेखकाचं उभं आयुष्य असतं. आयुष्यभर कमावलेलं अनुभवाचं संचित असतं. माणूस त्याच्या जीवनात सर्व अनुभव घेऊ शकत नाही. पण त्या अनुभवाची अनुभूती आपल्याला पुस्तक वाचनातून मिळत असते. जर्मनीचा जगप्रसिद्ध कवी गटे असे म्हणतो, “जेव्हा मी एखादं पुस्तक वाचतो. त्यावेळी वीस फूट उंचीचा होतो. मला काहीतरी नवीन गवसल्यासारखं वाटतं. मी आनंदित होतो आणि माझ्या विचारांच्या दिशा अधिक योग्य दिशेकडे वळतात.”


जशी पुस्तकं चांगली असतात तशी ती वाईटदेखील असतात. पण ती वाईट पुस्तकेदेखील आपल्याला सारासार विचार करायला शिकवतात. चांगल्या-वाईटातला फरक आपल्याला त्यामुळे कळत जातो. पुस्तकांमुळे शब्द संपत्ती वाढते, कल्पनाशक्तीला बहर येतो, दुसऱ्याच्या अंतर्मनात डोकावण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. पुस्तकांनी आपण अंतर्बाह्य नकळत बदलून जातो. म्हणून उत्तम ग्रंथांचं वाचन आपण केलं पाहिजे.


पुस्तकांमध्येसुद्धा प्रकार आहेत. काही पुस्तकं वाचून झाल्यानंतर, आपण भेळीचा कागद सोडून देतो तशी ती वाचून विसरून जायची असतात! काही पुस्तकं रोजच्या रोज वाचायला हवीत, अगदी रोजच्या सुग्रास जेवणासारखी! परंतु काही पुस्तक वाचून, समजून-उमजून ती मुरवायची असतात आपल्या आत! तर काही पुस्तकं, त्यांचं वाचन संपल्यानंतर आपल्या आत ती पुन्हा अवतीर्ण होतात नवनवे विचार घेऊन! काही पुस्तकं आपलं मनोरंजन करतात, आपल्याला आनंद देतात. तर काही आपल्याला अस्वस्थ करत असतात आणि हीच पुस्तकं आपला आयुष्यभर पाठलाग करत असतात.


ग्रंथ हे द्रोणाचार्य नाही तर आचार्य असतात. ते अर्जुनाला शिकवतात आणि एकलव्यालाही पुकारतात. ते आपल्या वाचकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव कधीही करत नाहीत. अगदी निरपेक्ष वृत्तीने आपल्याकडे जे काय आहे ते देत राहतातं. पुस्तकं मनाला शांती देतात, पुस्तकं मनात खळबळ माजवतात. पुस्तकं क्रांती घडवून आणतात. ज्या घरात पुस्तकांचा वावर असतो आणि ज्या घरात पुस्तकांचा मागमूस नसतो अशा दोन घरांमधील वातावरणात जमीन आसमानाचा फरक असतो.


पुस्तकं वाचणारा माणूस कधीही एकटा पडत नाही. कारण त्याच्या पुस्तकांच्या कपाटात मोठमोठी माणसं पाठीला पाठ लावून उभी असतात. पुस्तकं आपल्याला निर्भय बनवतात, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. खरंतर पुस्तकं ही परीसच असतात. ती माणसाच्या जीवनात आमलाग्र बदल घडून आणतात.


असं म्हणतात की, पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात. पण, खरंतर पुस्तकं आपल्याला सांगतात की, तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ती आपल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव करून देतात आणि याच अज्ञानाला व्यासंगी अज्ञान असे म्हणतात. ज्यातून माणसं वाचनासाठी प्रवृत्त होतात.


तर मित्रहो, अधिकाधिक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा. पुस्तकं विकत घ्या, हवं तर कपाटात ठेवा. मूड येईल तशी वाचा. पण ती रद्दीत कधीही काढू नका.


आणि हो शेवटचं सांगतो, ज्याच्या घरातला टीव्ही पुस्तकांच्या कपाटापेक्षा मोठा आहे, अशा माणसांशी कधीही वादविवाद करत बसू नका!
धन्यवाद

World Book Day 2025 | Jagtik Pustak Din | जागतिक पुस्तक दिन | Video

Leave a comment

error: