लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य चळचवळीतील अग्रगण्य नेते, भारतीय असंतोषाचे जनक, तेल्यातांबोळ्याचे पुढारी अशा अनेक उपाधींनी त्यांना गौरविले जाते. लोकमान्य टिळक यांची माहिती खाली दिली आहे .

नाव | बाळ गंगाधर टिळक |
मूळ नाव | केशव |
जन्म | २३ जुलै १८५६, चिखली ( दापोली – रत्नागिरी ), महाराष्ट्र |
विवाह | तापीबाई ( १८७१ ) |
मृत्यू | १ ऑगस्ट १९२०, मुंबई |
लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ या दिवशी झाला आणि मृत्यू मुंबई येथे १ ऑगस्ट १९२० या दिवशी झाला. त्यांचा अंत्यविधी गिरगाव चौपाटीवर लाखोंच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर तेथे टिळकांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यू समयी ते समस्त भारताचे अनभिषिक्त सम्राट होते. जनतेच्या तळ्यातील ताईत होते.
त्या काळी संपूर्ण देशात पुणे शहर हे राजकीय आणि सामाजिक चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करू इच्छणारी सारी मंडळी पुण्यातच येत असत. आणि म्हणूनच भारत वर्षातील अनेक राजकीय आणि सामाजिक चळवळींचा जन्म पुण्यातूनच झाला आहे.
टिळकांनी त्यांच्या सहकार्यांच्या सोबतीने फर्ग्युसन काॅलेज, डेक्कन एज्युकेशन ट्रस्टची स्थापना पुणे येथे केली. त्याच बरोबर पुण्यातून १८८१साली केसरी मराठीतून आणि मराठा इंग्रजीतून अशी दोन वृत्तपत्रे चालवली. गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर, नामजोशी ही मंडळी त्यांच्या सोबत होती. सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी या मुद्द्यावर आगरकर टिळकांमध्ये मतभेद होऊन ही दोन महान व्यक्तिमत्त्वे एकमेकांपासून दूर गेली.
टिळक जहालवादी राजकारणी होते. केवळ निवेदने,अर्ज विनंत्या यावर त्यांचा विश्वास नव्हता. बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक. लाला बाल पाल असे तीन जहालवादी नेते भारतवर्षावर आपले वर्चस्व गाजवत होते.
१८९७ ची पुण्यात आलेली प्लेगची साथ. त्यावेळी इंग्रज अधिकार्यांचे बेमूर्वतखोर वर्तन, चाफेकर बंधूंनी रॅंडचा केलेला खून, १९०५ची बंगालची फाळणी, टिळकांनी फाळणी विरोधात भारतभर चालवले चतुःसुत्री आंदोलन. त्यातून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ह्या नव्या संकल्पनांची ओळख भारतीयांना करून दिली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळविणारच ही सिंहगर्जना त्यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा द्यायला हवा म्हणून त्यांनी प्रसंगी मुस्लिम लीग या पक्षाला वेळप्रसंगी आंजारले गोंजारले. देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होऊन ब्रह्मदेशातील मंडाले येथे तरुंगवासही त्यांनी भोगला.(१९०८-१९१४)
Marathi Language | मराठी भाषा | माहिती, इतिहास,व्याकरण
गोपाळ जोशी सोबत पुण्यात घडलेले चहा प्रकरण अन् त्यात टिळकांनी घेतलेली भूमिकाही त्या काळी खूप गाजली होती. शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण यातही टिळकांची भूमिका वेगळीच होती.राजकारणात वेळोवेळी कठोर भूमिका घेणारे टिळक धार्मिक बाबतीत मात्र नरमाईची भूमिका घेताना दिसतात.
इंग्रज सरकार विरोधात लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव (१८९३) आणि महात्मा फुल्यांनी सुरू केलेला शिवजयंती उत्सव टिळकांनी मोठ्या प्रमाणावर (१८९५) सुरू केला. त्याद्वारे लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला.
लोकमान्य तुरुंगात असतानाची एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. त्यावेळी त्यांच्या मुलाचे शालेय शिक्षण नुकतेच संपले होते. त्याने आपल्या बाबांना पत्र पाठवून विचारले “बाबा मी आता काय करू?” टिळकांनी आपल्या मुलाला पत्रातून कळविले, “काय करायचे ते तुझे तूच ठरव. अगदी जोडे बनविलेस तरी चालतील. पण असा जोडा बनव की जगातील उत्कृष्ट जोडा तूच बनवावा. लोकांनी म्हटलं पाहिजे की जोडा घ्यावा तर टिळकांच्या पोराकडूनच घ्यावा.” सव्वा दोनशे वर्षापूर्वी आपल्या मुलाला निर्णय स्वतंत्र देणारे ते पालक होते.
१८९७ सालात पुण्यात प्लेगची साथ आली. त्यात माणसे पटापट मृत्युमुखी पडू लागली. त्यांचा मोठा मुलगाही प्लेगमध्ये गेला. तेव्हा टिळक म्हणाले प्लेगची होळी पेटलीय. त्यात सार्या गावातल्याच गोवर्या गेल्यात. आता आपल्या घरातूनही गेल्या.
लोकमान्य टिळकांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे
दि ओरायन, दि आर्टिक होम इन वेदाज, गीतारहस्य या सारखे ग्रंथ लिहिले. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी १९१०-१९१२ या कालावधीत “गीतारहस्य” हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. इंग्रज सरकारने हस्तलिखिते दिली नाहीत तर हाच ग्रंथ तुरुंगातून सुटल्यावर मी पुन्हा लिहून काढीन असे ते म्हणाले होते. या ग्रंथाचे प्रकाशन मात्र टिळक सुटल्यानंतर १९१५ साली करण्यात आले.
वर्ष | वृत्तपत्र | भाषा |
---|---|---|
1881 | केसरी | मराठी |
1881 | मराठा | इंग्रजी |
असे होते लोकमान्य टिळक. प्रचंड बुद्धिमानी, शुद्ध चारित्र्याचे लोकनायक, जहालवादी राजकीय मताचे नेते, देशप्रेमी, तळागळातील लोकांना आपलेसे वाटणारे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा बेधडक सवाल शासनकर्त्यांना विचारणारे, सार्या भारतवर्षावर स्वामित्व गाजवणारे, क्रांतिकारकांना सहकार्य करणारे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे भारतमातेचे असामान्य पुत्र होते. त्यांनी केलेल्या मजबूत पायाभरणीवरच भारतीय स्वातंत्र्याची भली मोठी इमारत महात्मा गांधींना उभी करता आली यात शंका नाही.
लोकमान्य टिळक यांना किती मुले होती?
४ मुलं आणि ३ मुली
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा कोणी दिला?
लोकमान्य टिळक १९१६ पासून
बाळ गंगाधर टिळकांनी गणेश चतुर्थी कधी सुरू केली?
1893