15 August Bhashan Marathi | 15 ऑगस्ट भाषण मराठी |15 august speech in marathi | 2025

15 August Bhashan Marathi - 15 ऑगस्ट भाषण मराठी - 15 august speech in marathi - 2025 - Marathi Sakha
15 August Bhashan Marathi – 15 ऑगस्ट भाषण मराठी – 15 august speech in marathi – 2025 – Marathi Sakha

15 August Bhashan Marathi | 15 ऑगस्ट भाषण मराठी |15 august speech in marathi | 2025

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो

नमस्कार मित्रांनो, आज मी आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझे काही विचार मांडत आहे.
१५ ऑगस्ट १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य दिन. ७०० वर्षांची गुलामी संपवून, मुगल आणि ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा नाश करून त्यांना भारताच्या सीमेबाहेर घालवून समस्त भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवले. स्वतःसाठी, जनतेसाठी, गोरगरिबांसाठी मुक्ती मिळवली तोच हा दिवस १५ ऑगस्ट!


१५ ऑगस्ट हा दिवस समस्त भारतीयांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. किंबहुना त्याहूनही अधिक प्राणप्रिय, गोड आणि समाधान देणारा असा हा दिवस आहे. कोणा एका कवीने म्हणून ठेवले आहे की, “शतकानंतर आज पाहिली, पहिली रम्य पहाट!” अशी रम्य पहाट १५ ऑगस्ट १९४७ ला समस्त भारतीयांनी पाहिली आणि आज जवळजवळ ७८ वर्ष आपण या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत. खरंच “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हाच माणूस धर्म असताना, जग मात्र क्रूर आणि निर्दयी बनत आहे. दुसऱ्याला गुलाम करणे, दास बनवणे यातच त्याला त्याचे शौर्य दिसते.

आपला भारत या गुलामगिरीच्या विळख्यात अनेक शतके अडकून पडला होता. भारतीय स्वतःचा धर्म, इतिहास साडेपाच हजार वर्षाची संस्कृती विसरून गेला होता. आपल्या पूर्वजांनी उभे केलेले सांस्कृतिक संचित पूर्णपणे नष्ट झाले होते. समस्त भारतीयांना याचे जराही भान नव्हते. त्यांनी परकीयांची मानसिक गुलामगिरी स्वीकारली होती. हेच आपले जीवन आणि हेच आपले नशीब यावर त्यांचा ठाम विश्वास बसला होता.


समस्त भारतीयांना भारतीयत्वाचा, भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटावा असे देशात काहीच घडत नव्हते. त्यामुळे एकतेचे भान यायला अनेक वर्षे जावी लागली. मग त्यातूनच भारतीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली. अनेक शूरवीरांनी आपले देह सरणावर ठेवले, अनेकांनी आपल्या घरादारावर नांगर फिरवले, अनेक भारतीयांनी सामाजिक आणि राजकीय सुधारणांमध्ये डोंगरा एवढे काम केले. तन मन धन अर्पूण काम केले.मग त्यातूनच एक मोठा लढा उभा राहिला. त्या लढ्यातूनच ब्रिटिशांना आपली दीडशे- दोनशे वर्षाची भारतावर असलेली सत्ता भारतीयांच्या स्वाधीन करावी लागली. ब्रिटिश गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयींना अधिक महत्त्व देण्यात आले.

देशाची विविध क्षेत्रात घोडदौड सुरू झाली. विविध प्रकारची प्रगती दिसू लागली. उद्योग, शेती, पाणी, शिक्षण आणि आरोग्य अशा चौफेर बाजूने भारतीय जनता जोराने काम करू लागली. मग बघता बघता ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती तो देश अवकाशामध्ये उपग्रह सोडू लागला. नव्हे नव्हे स्वतःबरोबर इतर राष्ट्रांचेही उपग्रह सोडू लागला. एक, दोन नव्हे तर शंभरहून अधिक उपग्रह एकाचवेळी पाठवू लागला. आता तर समस्त भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कामगिरी नुकतीच पार पडली. ती म्हणजे शुभांशू शुक्ला नावाचा एक भारतीय तरुण आंतरराष्ट्रीय प्रयोग शाळेमध्ये पंधरा दिवस राहून संशोधन करून आला. अवकाश संशोधनात स्वतःचे एक वेगळे स्थान भारताने निर्माण केले .खरंच ही प्रगती डोळ्यांत भरण्यासारखीच आहे. आपल्याला सुखावणारी आहे.

आपला देश अधिक प्रबळ, अधिक ताकदवान कसा राहील, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणापासून, कुरबूरींपासून सुरक्षित कसा राहील, एकसंध कसा राहील याची काळजी आपण घेतच आहोत. परंतु मित्रांनो सगळे दिवस सारखे नसतात. स्वातंत्र्यानंतरच्या दोन पिढ्या जवळजवळ निघून गेल्या आहेत. ज्या पिढ्यांनी स्वातंत्र्य लढा स्वतः अनुभवला, त्याबद्दल ऐकलं, पाहिलं त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल मोठा अभिमान होता. अशी पिढी हळूहळू लोप पावत आहे.

नव्या पिढीतील काहीजणांना तर राष्ट्रापेक्षा स्वतःचेच जीवन अधिक महत्त्वाचे वाटते. समाजापेक्षा स्वतः जास्त महत्त्वाचं वाटतो. त्यामुळे स्वार्थापायी, क्षुल्लक लोभासाठी तो राष्ट्रविघात कारवाया करू लागलेला आहे. समाजामध्ये दुहीची बीजे पेरू लागला आहे. अशावेळी देशांतर्गत शत्रू प्रबळ ठरतात आणि देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करतात. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

म्हणून एक तरुण म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, या देशाचा सजग नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचे हेच कर्तव्य आहे की आधी देश महत्त्वाचा! आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की, “देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.”


मित्रहो सर्वप्रथम राष्ट्र! मग बाकीच्या गोष्टी आल्या पाहिजेत. परंतु धर्म, प्रांत,भाषा यावरून देशात नेहमीच धुसफूस सुरू असते. सार्वजनिक ठिकाणी दंगली, जाळपोळ या माध्यमातून राष्टीय संपत्तीचे नुकसान आपण करीत राहातो. पर्यायाने आपलेच आपण नुकसान करीत असतो. अशावेळी आपण लबाड राजकारणी, आणि धूर्त समाजकंटकांच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्राचे हित डोळ्यांसमोर ठेवून आपण आपले वर्तन ठेवले पाहिजे. केवळ आपलेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही अशा विघातक कार्यापासून परावृत्त करण्यासाठी आपण सजग असलं पाहिजे. आपण एक सुजाण नागरिक म्हणून लक्ष दिले पाहिजे.


राष्ट्र म्हणजे केवळ भूमीचा तुकडा नव्हे! राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील माणसे! गोरगरीब, अपंग, वृद्ध, स्त्री पुरुष, बालक अशी सर्व प्रकारची माणसे, त्याच बरोबर भूमीवर असलेले प्राणी-पक्षी, झाडे, नद्या, समुद्र या सगळ्या गोष्टी म्हणजे राष्ट्र. त्यामुळे या सर्वांचीच काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरते. आपण म्हणाल एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी मी एकटा काय करू शकतो. परंतु “थेंबाथेंबानेच तळे साचत असते.” या उक्तीप्रमाणे मी एकटा राष्ट्राचा आदर्श नागरिक म्हणून काय करू शकतो


याचा आपण विचार केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे रहदारीचे नियम पाळणे, नैसर्गिक साधन संपत्ती आणि सांस्कृतिक वारशांचे जतन करणे ,स्वतः गैरप्रकार न करणे आणि इतरांसही तो करून न देणे, प्रामाणिकपणे पैसे कमावून इतरांना पैसा कमावण्याच्या किंवा काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे ,लोकांना साक्षर बनवणे, समाजात जनजागृती करणे, अंधश्रद्धेपासून समाजास परावृत्त करणे ,कलेमध्ये पारंगत होऊन जनतेला आनंद देणे ,खेळात पुढे जाऊन देशाची मान उंचावणे , स्त्रिया, अपंग, लहान मुले, वृद्ध, अनाथ लोकांना मदत करणे कायद्याचे पालन करणे .

अशा छोट्या छोट्या समाजहिताच्या देशहिताच्या गोष्टी करणे म्हणजेच देशसेवा करणे होय. देशातील प्रत्येकाने या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर त्यातूनच आपले राष्ट्र एक महान राष्ट्र म्हणून उभे राहील .आपला देश जगामध्ये सुख आणि समृद्धी निश्चितपणे गाठू शकेल .कारण मित्रहो केवळ जीडीपी वाढून चालणार नाही, केवळ देशाची गंगाजळी वाढून चालणार नाही तर देशातील जनता कशी समाधानी आणि आनंदी राहील या गोष्टींकडे आपले लक्ष असायला हवे आणि हेच खरे प्रगतीचे मापदंड आहेत .


म्हणून चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा या १५ ऑगस्टच्या निमित्ताने आपण एक शपथ घेऊया की, मी स्वतः राष्ट्राचा एक जागरूक नागरिक या नात्याने छोट्या छोट्या गोष्टीतून राष्ट्राच्या एकात्मतेला पूरक ठरतील अशा गोष्टी मी नित्यनेमाने करेन. गरीब, अपंग, वृद्ध, महिला यांना मदत करीन. त्यांचा सन्मान करीन. माझ्या वाट्याला जे कार्य आलेले आहे ते मी प्रामाणिकपणे करीन. चला तर घेऊया शपथ आणि म्हणू या भारत माता की जय!

15 August Bhashan Marathi | 15 ऑगस्ट भाषण मराठी |15 august speech in marathi | 2025 | Video

15 August Bhashan Marathi | 15 ऑगस्ट भाषण मराठी |15 august speech in marathi | 2025 | अजून काही भाषण

Leave a comment

error: