नमस्कार मित्रहो , आपण या लेखात विविध प्रकारच्या लहान मुलांच्या छान छान गोष्टी पाहणार आहोत.
दीपावलीचे दिवस जवळ आले होते. घरोघरी तयारी सुरू होती. घराची साफसफाई, दीपावलीचे पदार्थ, खरेदी, कोणाला कपडे तर कुणाला मोबाइल! घरात कुठल्याकुठल्या नवीन वस्तू, बाजारपेठ नुसती तुडुंब भरून गेली होती. विजयची सहामाही परीक्षा संपली होती. दिवाळीचा अभ्यास दिला होता.
दिवाळीच्या अभ्यासाची वही झटपट पूर्ण करून सुंदरशी सजवून विजय फटाके आणायला जाणार होता. तेही एका मोठ्या दुकानात. आणि मग एक दिवस आईकडून हजार रुपये घेऊन विजय मित्रांसोबत फटाके आणायला गेला. भायखळ्याच्या इसाकभाईच्या दुकानांमध्ये प्रचंड मोठी गर्दी होती. तरी तिथूनच फटाके घ्यायचे असा हा विजयचा नेहमीच शिरस्ता होता.
यावर्षी विजयची दिवाळी अगदी जोशात होती. त्याने नवीन कपडे घेतले होते. आई-बाबांकडून एक मोबाइलसुद्धा भेट मिळाला होता. आणि शिवाय आता फटाके विकत घ्यायला एक हजार रुपयेसुद्धा मिळाले होते! दुकानासमोर एक भली मोठी रांग होती. जवळजवळ शंभर एक लोक रांगेत उभे होते. विजयचे मित्र दुसर्या दुकानात जाऊया म्हणत होते. पण इथूनच फटाके घ्यायचे हा विजयचा हट्टच होता.
त्यामुळे सगळेच नाईलाजाने रांगेत उभे राहिले. विजयच्या पुढे एक काळा सावळा मुलगा मळके कपडे घालून उभा होता. एक तासाच्या प्रतीक्षेनंतर विजयच्या पुढे असलेल्या मुलाचा नंबर लागला. पण त्याला फटाके मिळालेच नाहीत. कारण त्याच्या जवळ पैसेच नव्हते. बिचारा रांगेबाहेर उभा राहिला. विजयने झटपट फटाके घेतले.पण त्याने फक्त पाचशे रूपयांचेच फटाके घेतले अन् चटकन बाहेर पडला.
तो गरीब मुलगा अजूनही तिथेच उभा राहून आशाळभूत नजरेने फटाक्याच्या दुकानाकडे बघत होता. विजय बाजूच्या फराळाच्या दुकानात गेला अन् उरलेल्या पाचशे रूपयांचा फराळ विकत घेतला. तोपर्यंत विजयचे मित्रही आले.
विजय त्या मुलाला म्हणाला, “बाळ तुझे घर कुठे आहे?” त्यांने न बोलताच समोरच दिसणाऱ्या झोपडपट्टीकडे बोट केले आणि मग विजय आपल्या मित्रांना म्हणाला,” चला आपण जरा या मुलाच्या घरापर्यंत जाऊया” आणि मग सगळे चालत पाचच मिनिटात त्याच्या घराजवळ पोहोचले.
मुलगा धावतच घरात गेला आणि त्यांनी आईला बाहेर बोलावले. त्याच्या आईला पाहताच विजयने नमस्कार केला आणि म्हणाला, “आमच्यातर्फे तुम्हाला ही दिवाळी भेट” असं म्हणून फटाक्यांची पिशवी आणि खाऊची पिशवी त्यामुलाच्या आईंच्या हातात दिली.
विजयच्या मित्रांनीही आपल्या पिशव्यांमधले थोडे थोडे फटाके काढून त्या पिशवीत भरले. हे बघून त्या मुलाच्या आईच्या डोळ्यांत टचकन पाणी आले आणि ती म्हणाली, “बाळांनो सुखी राहा. आम्ही कित्येक वर्षे आम्ही दिवाळी साजरी केली नाही. पण आज या वेळेला एवढे फटाके एवढा फराळ! आमच्या आयुष्यातली पहिली दिवाळी साजरी होणार आहे, आणि तीही तुमच्यामुळे!
तो मुलगादेखील आश्चर्याने विजय आणि त्याच्या मित्रांकडे पाहत होता. शेवटी तो मुलगा म्हणाला, “दादा थँक्यू” आणि पटकन घरात पळून गेला. त्या मुलाच्या आईचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन विजय घरी परतला. रिकाम्या हाताने घरी आलेल्या विजयला पाहातच आई म्हणाली, “काय रे विजय! फटाके नाही आणलेस? की हरवले पैसे कुठेतरी.” आणि मग विजयने आईला खुर्चीत बसवले अन् आणि समोर बसून घडलेला सगळा वृत्तांत आईला सांगितला.
विजय बोलत असताना विजयच्या आईच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, “अरे विजय किती मोठा झालास रे. अगदी माझ्याहीपेक्षा मोठा!” असं म्हणून तिने विजयला गच्च मिठी मारली. आणि खऱ्या अर्थाने विजयची दिवाळी साजरी…….!
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा