भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023

2023 हे जागतिक भरडधान्य म्हणजेच मिलेट्स वर्ष म्हणून साजरे करण्यात आले त्यानिमित्ताने – भाषण

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023 | Marathi Sakha
भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023 | Marathi Sakha

भरड धान्य – सर्वोत्कृष्ट धान्य

व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो; आज मी आपल्याशी भरड धान्य सर्वोत्कृष्ट धान्य याविषयी माझे विचार प्रकट करणार आहे.

मित्रहो; जेव्हा आपण धान्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे ही तृणधान्ये येतात, ही सगळी तृणधान्येच असून गहू, तांदूळ, मका सोडून इतर सर्व धान्यांना भरड धान्य असे म्हणतात. अर्थात इंग्लिशमध्ये “मिलेट्स” या नावाने ती सर्वांच्या परिचयाची आहेत. भरडधान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला विशेष शुद्धतेची गरज नसते.

पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळाचा वापर करून त्यावरील साली काढण्यासाठी ती भरडली जात असत. त्यावरून त्यांना भरड धान्य असे म्हणतात. देश स्तरावरील बहुतेक शेतकरी ती स्वतःला खाण्यासाठी व जनावरांना चारा म्हणून पिकवतात. ज्वारी, बाजरी ही साधारणता आकाराने मोठी असलेली धान्य ही “मोठी धान्य” म्हणजेच “ग्रेटर मिलेट्स” तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊन टॉप ही सर्व *बारीक धान्य* वा *मायनर मिलेट्स* म्हणून ओळखली जातात.

भरडधान्ये ही आशिया आणि आफ्रिकेच्या अर्ध उष्ण कटिबंधातील विशेषतः भारत, माली, नायजेरिया, नायजर या देशातील महत्त्वाची पिके आहेत. कोरड्या आणि उच्च तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांची चांगली उत्पादकता आणि छोटा हंगाम यामुळे ही पिके फायदेशीर ठरतात.

जेव्हा आपण *भरड धान्य हे सर्वोत्कृष्ट धान्य* म्हणतो तेव्हा त्याचे फायदे व गुणधर्म आपण लक्षात घेत असतो. मित्रांनो; भरड धान्ये ही पौष्टिक धान्ये म्हणून ओळखली जातात आणि तरीसुद्धा त्यांचा आपल्या आहारातील वाटा अतिशय कमी आहे. हे लक्षात ठेवूनच भरड धान्याचे आहारातील प्रमाण वाढावे, लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून *२०२३ हे जागतिक भरड धान्य वर्ष* म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मी मघाशीच म्हटले त्याप्रमाणे ही धान्य खूप पौष्टिक तर असतातच पण ती पचायला हलकीदेखील असतात. ती ग्लुटेन आणि ॲलर्जी मुक्तदेखील आहेत. वरी या भरड धान्यात १०-१२% इतके फायबर्स असतात. ती रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचे काम करतात. भरड धान्य तंतुमय असल्याकारणाने हृदयविकार, रक्तवाहिन्यांच्या संबंधित असलेले आजार दूर राहतात. भरडधान्य पाणी शोषून घेतात. त्यांच्या सेवनाने आतड्यात ओलावा निर्माण होतो. त्यामुळे बद्धकोष्टता होत नाही.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास भरड धान्य उपयोगी पडतात. कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा त्रास कमी करण्यासाठी ही धान्ये उपयुक्त ठरतात. भरड धान्यातून प्रथिने, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, झिंक ही खनिजे मोठ्या प्रमाणात मिळतात. यावरून एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे भरड धान्ये ही प्रथिने, फायबर्स खनिजे, क्षार आणि विविध जीवनसत्वांनी परिपूर्ण आहेत. संपन्न आहेत. एवढे असूनही आपल्याला भरड धान्य खाणे हे कमी प्रतिष्ठेचे वाटते हेच खरे!

पूर्वी; शेतकरी भरड धान्य स्वतःला खाण्यासाठी पिकवत असत. पण हरितक्रांतीनंतर आपण आपल्याकडचा हा ठेवा विसरून गेलो. आणि गव्हा- तांदळाच्या मागे लागलो. शरीराला अपायकारक असलेले ग्लुटेन गव्हाच्या सेवनाने आपण खात राहिलो आणि विविध आजारांना आमंत्रित करीत गेलो. घराघरातून गव्हाच्या चपात्या, पाव, पिझ्झा बर्गर यांची मागणी होऊ लागली. चपाती खाणे हे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. वरी या भरड धान्यात आढळणारे १०-%१२ तंतू म्हणजेच फायबर्स विसरून आपण तांदळाचा भात खाऊ लागलो. की ज्यात फक्त ०.२% तंतू म्हणजेच फायबर्स सापडतात.

लोहाचा नैसर्गिक पुरवठा करणारी बाजरीची भाकर आपल्याला नकोशी झाली. हाडे मजबूत ठेवण्यासाठी भरड धान्य विसरून आपण कॅल्शियमच्या गोळ्या खाऊ लागलो. मधुमेहींसाठी उपयुक्त ठरणारी भरड धान्ये आपण दूर लोटली आणि मधुमेहींची राजधानी- भारत हा किताब मोठ्या दिमाखास मिळवला. वजन नियंत्रित ठेवणारी, कमी कॅलरी असणारी, दिवसभर ऊर्जा पुरवणारी, भरडधान्ये खरोखरीच एका अर्थाने वरदान ठरणारी आहेत. आपल्या देशात विपुल प्रमाणात मिळणाऱ्या भरड धान्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे असे म्हणावेसे वाटते.

मित्रहो; या स्पर्धेच्या निमित्ताने भरड धान्य विषयी भरपूर माहिती मिळाली आणि मला आश्चर्यच वाटले! की आपण आपल्या घरचा हा ठेवा विसरून कसे गेलो. या स्पर्धेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की यापुढे मी माझ्या आहारात भरड धान्याचा वापर नक्कीच वाढवणार आहे. गव्हा- तांदळाचे प्रमाण कमी करून ज्वारी, बाजरी, वरी यासारख्या भरड धान्याचे सेवन करण्याचा मी निश्चय केला आहे आणि तसा आग्रह मी माझ्या आईकडे धरणार आहे.

शेवटी कवितेच्या चार ओळी सादर करून मी माझ्या भाषणाला विराम देतो.

भरड धान्य कविता

धान्यात धान्य भरड धान्य
तेच आहे सर्वोत्कृष्ट धान्य
ज्वारी बाजरी वरीचे खाणे
आहे आता जगाला मान्य

॥जय हिंद- जय महाराष्ट्र॥

भरडधान्य आणि आरोग्य

व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो; आज मी आपल्यासमोर भरड धान्य आणि आरोग्य (जीवनशैलीचे आजार) या विषयावर माझे विचार प्रकट करणार आहे.

मित्रहो; मनुष्यप्राणी हा मिश्राहारी आहे. तो मांसाहारा बरोबरच फळभाज्या, पालेभाज्या, डाळी आणि तृणधान्यही खातो. आपण जी तृणधान्य खातो त्यात गहू, तांदूळ, मका, बार्ली, ज्वारी, बाजरी, नाचणी वरी ही धान्य येतात. यापैकी गहू, तांदूळ, मका ही तृणधान्ये वगळता इतर धान्यांना “भरडधान्य” आणि इंग्रजीत “मिलेट्स” असे म्हणतात.

पूर्वी उखळ आणि मुसळ वापरून ही धान्य भरडून काढली जात म्हणून या धान्यांना भरड धान्य असे म्हणतात. भरड धान्याचे दोन प्रकार सांगता येतात. ज्वारी, बाजरी ही “मोठी धान्य” किंवा “ग्रेटर मिलेट्स” आणि राळे, नाचणी, वरी, राजगिरा इत्यादी “बारीक धान्य” म्हणजेच “मायनर मिलेट्स” असे म्हणतात.

भरड धान्य ही माणसांना खाण्यासाठी, जनावरांना चारा आणि इंधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. भरडधान्य ही खूपच पौष्टिक आणि पचायला हलकी असल्याने ती आपल्या आहारात असायलाच हवीत. म्हणूनच सध्या मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे.२०२३ हे जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सध्याच्या काळात आपली जीवनशैली खूपच बदलली आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आवडीनिवडी, कामाचे स्वरूप, राहण्याचे ठिकाण, झोपेच्या वेळा, जीवघेण्या स्पर्धा, मानसिक ताण- तणाव या गोष्टींचा जीवनशैलीत समावेश होतो.

आता हेच पहा ना; पिझ्झा, बर्गर, पाव यासारखे मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पचन कार्य मंदावत जाते. अपचनाचा त्रास, बद्धकोष्ठता यासारखे आजार बळावतात. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने जंतुसंसर्ग होऊन गॅस्ट्रो, कावीळ, टायफाॅईड, कृमी यासारखे आतड्याचे आजार होतात. अति तळलेले, अतिशय तिखट पदार्थ खाल्ल्याने, वेळी अवेळी घाई घाईने जेवल्याने, जेवणानंतर लगेच झोपल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो.

वातानुकूलित वातावरणात खुर्चीत बसून दहा-बारा तास काम करणे, शारीरिक कामाचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील चरबीच्या पेशी संख्येने व आकारमानाने वाढतात. त्यामुळे स्थूलपणा वाढतो. “अति खाणे आणि बसून राहणे” हा आपल्या जीवनशैलीचा नवा महामंत्र झाला आहे. वाढलेले वजन व चालण्याचा अभाव यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे. अनुवंशिकता नसतानाही अनेकांना मधुमेह (डायबेटीस) होतोय. भारतात मधुमेहींचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. स्निग्ध पदार्थांचे सेवन, मानसिक ताण-तणाव या सर्वांचा विपरीत परिणाम आपल्या हृदयावर होत असतो.

तर मित्रहो; या जीवनशैलीमुळे आपण विविध रोगांना नकळत बळी पडत असतो. आपण जर आपल्या आहारात भरड धान्याचा वापर वाढवला तर अगदी नकळतपणे आपण या आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. कारण आपली सर्व भरडधान्य विविध जीवनसत्वे, खनिजे प्रथिने आणि क्षारांनी समृद्ध अशी आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्वारी, बाजरी राळे, वरी ही धान्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आपल्याला देतात. राळे,कोदो, भगर, छोटा सावा या धान्यात ८-१२.५ % इतके फायबरचे म्हणजेच तंतूंचे प्रमाण असते. तर भगर आणि बाजरीमध्ये १५-१७ % लोहाचे प्रमाण आढळते.

लहान बाळाची मेंदू वाढ, स्तनदा माता, गर्भार माता यांना लोहाची गरज असते. ती ही धान्य सहज भागवतात. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा त्रास संभवत नाही. धान्यातील प्रथिने पेशींची, स्नायूंची बळकटी वाढवतात. शरीराला मोठ्या प्रमाणात उपयोगी पडणारे व्हिटॅमिन B3 हे जीवनसत्व ब्राऊन टॉप या भरड धान्यात जवळजवळ १८% इतके असते.

लोहाचे प्रमाण कमी झाल्यास अभ्यासात लक्ष न लागणे, अशक्तपणा येणे या गोष्टी घडतात. शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरस प्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी झिंक ही सर्व खनिजे भरड धान्यातून आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात. भरडधान्य पचायला हलकी असल्याने वृद्ध, आजारी, लहान मुले यांना उपयुक्त असतात. ती विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

खरेच किती गुणकारी आहेत भरडधान्ये! विविध जीवनसत्वे, प्रथिने फायबर्स यांनी समृद्ध अशी आहेत. आणि म्हणूनच आजच्या नव्या जीवन शैलीमुळे जे जे रोग आपणास जडले आहेत ते सर्व दूर करण्याचे व ते आजार होऊ न देण्याचे सामर्थ्य भरड धान्यांमध्ये आहे. म्हणूनच मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपल्या रोजच्या आहारात किमान१०० ग्रॅम भरड धान्याचा वापर करा.

चला तर मग;

भरड धान्य कविता

ज्वारी खाऊ बाजरी खाऊ

भरड धान्य सगळी खाऊ

राळे वरी भगर नाचणी

खाऊन सर्व निरोगी राहू !

हृदयविकार मधुमेह

जीवन संपवेल ताणतणाव

भरड धान्याचा करू वापर

आजच करूया हा ठराव

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र …

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: