मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi 2023

मकर संक्रांत” या शब्दात “मकर” हे एका राशीचे नाव असून संक्रांत हा शब्द “संक्रमण” या शब्दावरून तयार झाला आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश यावरून मकर संक्रांत असे म्हटले जाते.

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi | Marathi Sakha
मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi | Marathi Sakha

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi 2023

पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे बारा भाग केले आहेत. त्यांना राशी असे म्हणतात. त्यातील दहावा भाग हा मकर रास म्हणून ओळखला जातो.

थोडक्यात असे म्हणता येईल की १४ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि लीप वर्षात १५ जानेवारीला प्रवेश करतो. याचाच अर्थ असा की १४/१५ जानेवारीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. ह्या वेळेला सूर्य भारतीय भूमीपासून खूप दूर गेलेला असतो. त्यामुळे भारतात हिवाळा हा ऋतू सुरू असतो.

पृथ्वीच्या गोलाचे आपण तीन काल्पनिक भाग पाडले आहेत. शून्य अक्षांशावर विषुववृत्त, उत्तर गोलार्धात साडेतेवीस अक्षांशावर कर्कवृत्त, जे भारताच्या मध्यातून जाते आणि दक्षिण गोलार्धात साडेतेवीस अक्षांशावर मकरवृत्त आहे. सूर्य याच कर्क आणि मकर वृत्तांमध्ये फिरत असतो. सूर्य मकरवृत्तावर असतो तेव्हा भारतात हिवाळा तर सूर्य कर्कवृत्तावर असताना भारतात उन्हाळा हा ऋतू असतो.

जेव्हा सूर्य कर्कवृत्तावरून परत मागे फिरतो त्याला सूर्याचे दक्षिणायन असे म्हणतात. तर जेव्हा सूर्य मकरवृत्तावरून माघारी फिरतो त्याला सूर्याचे उत्तरायण असे म्हणतात. यावरून मकर संक्रांती ही एक “खगोलीय घटना” आहे हे आपल्या लक्षात येते. हाच दिवस आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो. खरंतर आधुनिक खगोल विज्ञानानुसार सूर्याचे उत्तरायण २२ डिसेंबर या दिवशी सुरू होते. या दिवशी पृथ्वीवर सर्वात मोठी रात्र असते. या दिवसापासून सूर्य तिळातिळाने मोठा होऊ लागतो. या काळात भारतात थंडी असते. म्हणून तिळाचे म्हणजे स्निग्ध पदार्थ खावे असे म्हणतात. जेणेकरून थंडीमुळे आपली त्वचा कोरडी पडणार नाही.

मकर संक्रांतीच्या दिवशी देवीने संंकरासुराची हत्या केली असे म्हटले. या दिवशी शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना भेट देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगड्यात(सुघट…या शब्दाचा अपभ्रंश सुगड) भरून देवाला अर्पण करतात. तिळाचे लाडू खातात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हळदी कुंकवाचे घरोघरी वा सामुदायिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाशी आपण सुसंवाद ठेवला पाहिजे असा संदेश मकर संक्रांतीचा सण आपल्याला देत असतो. हा सण हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी तर संक्रांतीच्या नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन असे म्हणतात. त्या दिवशी किंंकरासुर नावाच्या राक्षसाला संक्रांती देवीने ठार मारले आणि जनतेला त्याच्या छळापासून मुक्त केले. त्या दिवशी कोणतेही शुभकार्य करत नाहीत असं म्हटलं जातं.

भोगी हा महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी मिश्र भाजी बनवली जाते. बाजरी, ज्वारीच्या भाकरी तीळ लावून बनवल्या जातात.

महाराष्ट्रात मकर संक्रांती, पश्चिम बंगालमध्ये मोकर सोनक्रांती, नेपाळमध्ये माघे संक्रांती, आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी या नावाने हा सण ओळखला जातो. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मराठी भाषेमध्ये संक्रांत येणे हा एक वाक्प्रचार आहे. चला तर मग त्याविषयी अधिक माहिती घेऊया.

वाक्प्रचार :- संक्रांत येणे

अर्थ :- संकट येणे, अरिष्ट येणे

वाक्यात उपयोग :- एकापाठोपाठ एक नुकसानीच्या बातम्या कानावर पडताच श्यामरावांना आपल्यावर संक्रांत आल्याचे वाटले.

स्पष्टीकरण:-

संक्रांतीच्या दिवशी देवीने संकरासुराची हत्या केली. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेने येते आणि दुसर्‍या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्याच दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते. तर ज्या दिशेला जाते व पहाते तिकडे संकट कोसळते असे समजले जाते. यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट कोसळणे असा वाक्प्रचार मराठी भाषेत रूढ झाला आहे.

१४ जानेवारी १७६१ या संक्रांतीच्या दिवशी हरियाणातील पानिपत येथे अहमदशहा अब्दाली सोबत झालेल्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड पराभव aझाला. त्यात लाखभर मराठी माणसे मरण पावली. त्यामुळे महाराष्ट्रात संक्रांतीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: