व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो. आज मी आपल्यापुढे गांधी जयंती निमित्ताने महात्मा गांधींं विषयी बोलणार आहे. “माझे सत्याग्रहाचे प्रयोग” हे त्यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. तेव्हा गांधीजींबद्दल भरपूर माहिती मिळाली आणि त्यानंतर गांधीजी मला खूप आवडू लागले.
Table of Contents
२ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असून, महात्मा ही पदवी त्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. तर राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरू होते.
महात्मा गांधी संपूर्ण भारतात बापू या नावाने अधिक लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता इतकी होती की पत्रावर पत्ता म्हणून नुसते बापू जरी लिहिले तरी भारतभरात ते जेथे असतील तेथे पत्रं पोहोचत असत. देश विदेशातील अनेक लोक त्यांना येऊन भेटत असत.
महात्मा गांधींनी गुलामगिरी विरोधात दक्षिण आफ्रिकेत चळवळ चालवली. तेथे २१ वर्ष काढल्यानंतर ते भारतात परत आले आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला.
इंग्रजांच्या तावडीतून भारताला सोडवण्यासाठी त्यांनी भारतातील सुशिक्षित, अशिक्षित, शेतकरी, कामगार , महिला, युवक अशा सर्वांना एकत्र करून एक मोठी चळवळ उभी केली आणि त्याच जोरावर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. सत्याग्रह आणि अहिंसा या दोन गोष्टींच्या जोरावर त्यांनी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे सत्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असणे आणि अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारे हिंसा करायची नाही या दोन गोष्टींमुळे बहुसंख्य भारतीय जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि एक मोठा लढा त्यांना उभारता आला.
महात्मा गांधींनी जेव्हा भारतातील गरिबी पाहिली तेव्हा संपूर्ण अंगभर कपडे वापरण्याचे त्यांनी नाकारले. त्यानंतर फक्त कमरेभोवती पंचा(लहान धोतर) गुंडाळून पूर्ण जगभरात ते फिरले.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना तर एक माणसाचं सैन्य असे म्हणत. आणि असा माणूस कधीकाळी या पृथ्वीतलावर जन्माला आला होता यावर पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाही, असेदेखील त्यांनी उद्गार काढले होते.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९२० नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व सूत्रे महात्मा गांधींच्या ताब्यात आली आणि त्यानंतर पुढील सर्व चळवळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. चंपारण्यातील नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा, दांडी यात्रा, चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी त्यांनी उभारल्या.
महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे एक मोठा आश्रम बांधला आणि तेथूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे हलवली. गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हणत. इतके कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी महाराष्ट्रातून त्याकाळी निर्माण होत होते.
महात्मा गांधींनी हरिजन नावाचे वृत्तपत्र चालवले. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे, असं त्यांचे मत होते. चरखा चालवणे, गाव स्वच्छ ठेेवणे अशी विविध कामे त्यांनी भारतीय जनतेला लावून दिली होती. खेड्याकडे चला आणि खेडी स्वयंपूर्ण बनवा असा महामंत्र त्यांनी भारतीय जनतेला दिला होता.
पांढरी शुभ्र टोपी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वापरायला दिली. त्यांनी स्वतः कधीच कोणतीच टोपी वापरली नाही. परंतु त्या पांढऱ्या शुभ्र टोपीलाच पुढे गांधी टोपी असे नाव मिळाले.
गांधीजी आपल्या तत्त्वांवर फार ठाम होते. आपल्या हातून काही चूक घडली तर त्यासाठी ते उपवास करत असत. इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन म्हणून उपोषणाला बसत.
असे हे गांधी की ज्यांच्यापासून जगभरातील अनेक देशातील नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा घेतली. आपल्या जनतेला एकत्रित आणण्यासाठी सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी निवडला.
आज महात्मा गांधी हे संंपर्ण जगातील २०व्या शतकातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून गणले गेले आहेत. महात्मा गांधींवर आजवर हजारो पुस्तके लिहिले गेली आहेत. अनेक देशात त्यांचे असंख्य पुतळे आहेत. अनेक देशांमध्ये त्यांच्या नावाने असंख्य रस्ते आहेत.
अनेक देशातील विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये त्यांच्या नावाचे धडे मुलांना अभ्यासासाठी आहेत. केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर प्रभाव टाकणार्या माझ्या आवडत्या नेत्याला दिल्ली येथे प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालून ठार मारले आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला. आज भारतीय चलन म्हणजेच कागदी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापलेले आहे.
महात्मा गांधी भारतातील प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहेत. गांधींवर प्रेम करणारे असोत वा त्यांना विरोध करणारे असोत, सर्वजण महात्मा गांधींचे मोठेपण मानतात. अशा या महात्म्याला माझा त्रिवार सलाम.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.
जय हिंद जय महाराष्ट्र..
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा