आज या लेखात आपण थोडक्यात भाषा या विषयावर बोलणार आहोत.

Table of Contents
भाष् या धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. भाष् म्हणजे बोलणे. उभ्या संरचनेच्या शरीरयष्टीमुळे शरीरातून बाहेर पडणारी हवा माणसाला जागोजागी अडवता येते. आणि मग त्यातून ध्वनी निर्माण होतात. त्याच ध्वनींनी भाषा बनलेली असते. असं म्हणतात की भाषेमुळे माणसाला संवाद साधता येतो. ते खरंही आहे.
पण सूक्ष्म विचार केला तर माणूस भाषेविनाच खूप काही बोलत असतो. आणि फार कमी वेळा बोलण्यासाठी भाषेचा वापर करत असतो. भाषेचा शोध हा माणसाने लावलेला एक मोठा शोध होय. अशी भाषा इतर सजीव प्राण्यांना निर्माण करता आली नाही हेही तितकेच महत्त्वाचे!
आज जगामध्ये असंख्य भाषा आहेत. भारताचा जरी विचार केला तरी शेकडो भाषा आज अस्तित्वात आहे. त्यातही मराठीचा जर विचार केला तर जवळजवळ बारा कोटी लोक मराठी बोलतात. मराठीच्या जवळपास २४ मोठ्या बोलीभाषा आहेत.
बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यात मूलतः फरक एवढाच की प्रमाणभाषा ही लिपी बद्ध असते. ती सार्वत्रिक असते. लेखनासाठी, शिकण्यासाठी ती प्रमाण मानली जाते. त्या प्रदेशातील सार्वत्रिक असते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते. तिला स्वतःची लिपी नसते.
खरंतर एखादी नदी जशी असंख्य ओढे आणि नाल्यांमुळे समृद्ध होते, मोठी बनते. त्याचप्रमाणे असंख्य बोली भाषेतून येणाऱ्या शब्दांमुळे प्रमाणभाषा ही समृद्ध बनत असते. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेेत. उदाहरणार्थ मालवणी, खानदेशी, अहिराणी, वऱ्हाडी भाषांनी प्रमाण मराठी भाषा ही समृद्धी केली आहे. प्रमाण भाषा हीसुद्धा बोलीभाषाच असते. ती फक्त एका विशिष्ट प्रांतात बोलली जाणारी असते.
उदाहरणार्थ मराठीची प्रमाणभाषा ही पुण्यातील ब्राह्मणांची भाषा होय. इंग्रजी सत्तेच्या काळात पुण्यातील ब्राह्मणवर्ग इंग्रजी शिकून उत्तम ज्ञानग्रहण करून सत्तेमध्ये सहभागी झाला. त्यामुळे त्यांचीच भाषा मराठीची प्रमाणभाषा गृहीत धरली गेली.
मित्रांनो, भाषेचा अभ्यास करणे ही एक आनंददायी आणि समाधान देणारी गोष्ट असते. कारण मातृभाषेविषयी बोलणं यासारखी आनंदाची दुुसरी गोष्ट नाही. सध्याच्या काळात विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, आणि संगणक यांचंच ज्ञान मिळवण्याची सर्वत्र धडपड सुरू आहे. त्यामध्ये मातृभाषा मागे पडते आहे की काय असं वाटते.
परंतु माणसांची मुलं शाळेत जातात ती फक्त गणित आणि भाषा शिकण्यासाठी. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण गणितामुळे माणसाची तर्कबुद्धी वाढीस लागते. आणि भाषेमुळे संवादकला वाढीस लागते. मनुष्य हा मूलतः समाजप्रिय प्राणी आहे.
तो लहानपणापासून अगदी त्याच्या मृत्यूपर्यंत समाजातच राहात असतो. त्यामुळे समाजाशी संवाद साधने हे त्याला अत्यंत आवश्यक बनते. आणि म्हणूनच भाषा ही मानवी जीवन सुखकारक बनवण्यासाठी फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं.
चला तर मग आपण आपली मातृभाषा मायमराठी बोलूया, लिहूया आणि वाचूया !
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा