दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक. भारतातील सार्वत्रिक सांस्कृतिक सण! हा सण पराक्रमांचा, विजयाचा, यशाचा, मंगल दिवस मानला जातो. अश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी घटस्थापना होते. मातीच्या घटात नऊ धान्यांची पेरणी केली जाते. नऊ दिवसानंतर धान्याची रोपे दसऱ्याच्या दिवशी देवीवर वाहतात. तो प्रसाद म्हणून भक्षण करतात. दसरा हा सण शेतकऱ्यांचा लोकोत्सव आहे. कारण या वेळेला पिके कापणीस तयार झालेली असतात.
Table of Contents
दसरा हा सण केवळ भारतातच नव्हे तर जावा,सुमात्रा या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. हा सण तर नेपाळचा राष्ट्रीय सण आहे. दसरा विजयादशमी, दशहरा, नवरात्री, दुर्गोत्सव या नावाने ही ओळखला जातो.
अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करतात. त्या घटाला गर्भ असे म्हणतात. नवरात्रीत खेळला जाणारा गरबा आणि दांडियारास ही रास क्रीडेची रूपे आहेत. कृष्ण आणि गोपिकांची रासक्रीडा. रस या शब्दावरून रास शब्द येतो. या ठिकाणी भक्तीरस अपेक्षित आहे.
सृजनशक्तीची पूजा नवरात्रीतील गरब्यात केलेली दिसते. गर्भपासून गरबा. मध्यभागी गर्भदीप ठेवूून त्या भोवती फिरतात. हा गर्भदीप सृजनशक्तीचे प्रतीक मानला जातो. मातीचा दिवा म्हणजे देह आणि पेटलेली ज्योत म्हणजे शरीरातील चैतन्य. बंगालमध्ये हा पाच दिवसांचा उत्सव असतो. अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी म्हणजेच सुष्टांचा दृष्टांवर विजय, प्रकाशाचा अंधारावर, सत्प्रवृत्तींचा विकृतीवर मिळवलेला विजय. महाकाय रावणाचा नाश आणि त्याद्वारे माणसांमधल्या पशुत्वाच्या भावनेचा केलेला वध.
दसरा या सणाशी संबंधित अनेक पुराण कथांचा संबंध जोडला गेला आहे. त्रेता युगात दशहरा म्हणजेच दहा तोंडांच्या रावणाचा पराभव झाला. यावरूनच दसरा या शब्दाची निर्मिती झाली आहे. असं मानलं जातं की याच दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला. याच दिवशी द्वापार युगात पांडवांनी शमीच्या झाडावर लपवून ठेवलेली आपली शस्त्रे बाहेर काढली आणि विराट राजाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सेनेचा पराभव केला.
दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी पुरणपोळीचा वा गोडधोड स्वयंपाक केला जातो. लोक सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने एकमेकांना अलिंंगन देतात.
एक कथा अशीही सांगितली जाते की, वरतंतू ऋषींचा एक शिष्य की ज्याचे नाव कौत्स्य होते. त्याने अभ्यास संपल्यानंतर आपल्या गुरूंना दक्षिणा मागण्याची विनंती केली. परंतु आपल्या शिष्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही म्हणून वरतंतू ऋषी म्हणाले की, “तू मला काहीही दक्षिणा देऊ नकोस.” परंतु शिष्य कौत्स्याने गुरूंकडे दक्षिणा घ्यावी म्हणून खूपच आग्रह धरला. मग वरतंतू ऋषींनी रागाने त्याला म्हटले माझ्याकडून चौदा विद्या शिकलास. प्रत्येक विद्येचे एक कोटी अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन ये.
ही विनंती ऐकल्यानंतर शिष्य कौत्स्य रघू राजाकडे गेला आणि त्याला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा देण्याची विनंती केली. रघुराजा हा न्यायी आणि अत्यंंत पराक्रमी होता. तो कौत्साला म्हणाला की, “मी आत्ताच सर्व संपत्ती दान केली आहे. पण मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही.” असे म्हणून त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले. हे पाहताच इंद्राने घाबरून कुबेराला आदेश दिला की, “रघू राजाला हवी तेवढी संपत्ती देऊन टाक.” मग त्याने सुवर्णमुद्रांचा अक्षरशः पाऊस पडला. तो सुवर्णमुद्रांचा पाऊस ज्या ठिकाणी पडला तिथे आपट्याची झाडे होती.
मग कौत्स्याने त्यातील फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेेतल्या. आता उरलेल्या सुवर्णमुद्रांचे करायचे काय? असा प्रश्न रघू राजाला पडला. उरलेली संपत्ती तो स्वतःही घेऊ इच्छित नव्हता. म्हणून त्याने जनतेला सांगितले की, “तुम्ही हे सर्व धन लुटून घेऊन जा.” तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची प्रथा सुरू झाली. त्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने सोने समजून एकमेकांना दिली जातात.
याच दिवसात दुर्गा मातेचे दुर्ग नावाच्या राक्षसाशी, चंडीकेचे चंड नावाच्या राक्षसाशी आणि महिषासुर मर्दिनीचे महिषासुराशी युद्ध झाले. हे युद्ध नऊ दिवस नऊ रात्र सुरू होते. शेवटी या युद्धात मातेला जय मिळतो.
दसरा हा सण मुख्यत्वे कृषी विषयक सण मानला जातो आणि म्हणूनच सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपात वास करणाऱ्या देवीला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो असं म्हटलं जातं. नव धान्यांची पेरणी केलेला घट हा फलप्राप्तीचा आणि संपन्नतेचा प्रतीक मानतात. विश्वाच्या निर्मितीसाठी हीच मातृशक्ती जननक्रिया घडविणारी असते. म्हणून तिला आदिशक्ती, जगतधारी,जगदंबा म्हणतात.
तर असा हा दसरा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा