आज आपण वेताळबाबाची एका छानश्या गोष्टीची मज्जा घेणार आहोत.
गोष्ट वेताळबाबाची !
विनू दरवाजात बसला होता. हातात ‘एका भुताची गोष्ट’ हे पुस्तक होतं. सकाळची कोवळी उन्हे त्याच्या अंगावर पडत होती. आईचं घरात काम सुरू होतं. बाबा नुकतेच कामाला गेले होते. कालच विनूची परीक्षा संपली होती. त्यामुळे तो तसा निवांतच होता.
Table of Contents
पुस्तक वाचता वाचता त्याचं लक्ष बाहेर गेलं. रस्त्यावरून एक कुत्रा धावत चालला होता. काळ्याकुट्ट रंगाचा, हट्टाकट्टा, उंचपुरा आणि लांबलचक! एवढा मोठा कुत्रा विनूने कधीच पाहिला नव्हता. तो लगबगीने दरवाज्यातून उठला आणि कुत्र्यामागे धावू लागला. धावताना विनूला गंमत वाटत होती. कुत्रा पुढे आणि विनू मागे. असा खेळ बराच वेळ सुरू होता. आता कुत्रा हळूहळू चालू लागला.
तसा विनूनेदेखील आपला वेग कमी केला. त्याचं गाव केव्हाच मागं पडलं होतं. माळरान संपून जंगल सुरू होणार होतं. समोर एक टेकडीवजा डोंगर दिसू लागला. कुत्र्याने आपला मोर्चा त्या दिशेने वळवला. तसा विनू थबकला. कारण त्या दिशेला कोणतेच गावकरी सहसा जात नसत.
पण विनूने विचार केला, बघूया तरी काय आहे तिकडे! म्हणून तो कुत्र्यामागे जाऊ लागला. टेकडीच्या पायथ्याशी वेताळबाबाचं मंदिर आहे एवढं तो ऐकून होता. अन् तिथल्या भुताटकीबद्दलही! तेवढ्यात एक आश्चर्य घडले. त्याच्यापुढे चालणारा कुत्रा हळूहळू छोटा छोटा होत गेला. इतका बारीक झाला की तो बघता बघता दिसेनासा झाला.
आतापर्यंत सोबत असणारा भला मोठा कुत्रा एकाएकी गायब झाल्याचे बघताच विनूच्या अंगावर काटा आला. “अरे असे कसे झाले!” असा तो पुटपुटला. पण तो चालायचा काही थांबला नाही. त्याला क्षणभर वाटले आपण थांबूया, परत मागे जाऊया. पण त्याचे पाय त्याला थांबू देत नव्हते. ते सतत त्याला पुढे पुढे ओढत होते. थोड्याच वेळात विनू समोरच्या गर्द झाडीत शिरला.
तशी थंडगार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगावर आली. जमिनीवर पडलेला पालापाचोळा सळसळ आवाज करीत उडाला अन् त्याच्या अंगावर आला. बराच वेळ चालल्याने विनू दमला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. म्हणून तो जवळपास कुठे पाणी मिळते का ते पाहू लागला. डोंगराच्या पायथ्याशी गर्द झाडीतून वाट काढता काढता त्याला वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला आणि त्याला जरा हायसे वाटले. थोडा पुढे जातो ना जातो तोच त्याला खळखळणारा ओढा दिसला.
पण समोरचं दृश्य बघून तो घाबरलाच. कारण ओढ्याचं पाणी चक्क लालभडक होतं. विनूला प्रश्न पडला डोंगरातून आलेलं पाणी लाल कसं? आता त्याच्या लक्षात येऊ लागलं की सारी टेकडी आणि इथला परिसर वेताळबाबाचा परिसर म्हणून गाव ओळखत होतं. इथे पदोपदी भुताटकीचा प्रभाव जाणवतो. कित्येक लोक इथे आले ते परत गेलेच नाहीत. म्हणून या वाटेला सहसा कोणी जात नव्हतं. हे सारं आठवत असताना विनूला दरदरून घाम फुटला.
आपण इथे यायला नको होतं. विनूला खूप पश्चाताप झाला. पण आता दुसरा पर्याय नव्हता. तहान तर खूपच लागली होती. पण हे लालभडक पाणी प्यायचं कसं? याचा तो विचार करीत असतानाच एक आवाज आला, “घाबरू नकोस. पी ते पाणी. तुला काही होणार नाही.” असा धीर गंभीर आवाज ऐकून तो सावध झाला. घाबरून इकडे तिकडे बघू लागला. पण तेथून पळण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरून पडला. हाताला थोडंसं खरचटलं.
तसा पुन्हा आवाज आला. “घाबरू नकोस मला मी आहे ना. पी ते पाणी आणि धू हाताची जखम त्या पाण्याने.” आता येथून आपली सुटका नाही हे विनूने ओळखले अन् अगदी सावधपणे पाण्यात हात घातला आणि काय आश्चर्य, विनूचा पाण्याला स्पर्श होताच पाण्याचा लालभडक रंग गायब होऊन ते पाणी पांढरे शुभ्र आणि नितळ झाले. मग त्याने ते पाणी घटा घटा प्यायले.
त्याच पाण्याने हाताची जखम धुतली आणि मागे वळला. बघतो तर काय आजूबाजूची झाडे स्वतःहून दूर झाली होती. इकडे तिकडे पडलेले दगड धोंडे बाजूला झाले होते. विनूला जाण्यासाठी एक छोटासा पण छानसा रस्ता तयार झाला होता. त्यावर लाल रंगाचे कार्पेट अंथरले होते. दोन्ही बाजूने फुलझाडे फुुलली होती. त्या फुलांच्या पाकळ्यांचा सडा रस्त्यावर पडला होता. त्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत विनू सावकाश आणि सावध नजरेने इकडे तिकडे बघत पुढे निघाला.
आता ही वाट आपल्याला कुठे घेऊन जाणार या कल्पनेनेच विनूला भडभडून आले होते. पण तो धीर गंभीर आवाज विनूवर लक्ष ठेवून होता. “घाबरू नकोस तू पहिली परीक्षा पास झालास. तू भाग्यवान आहेस. तुझ्या स्पर्शाने आमचा लाल ओढा शुभ्र स्वच्छ पाण्याचा बनला. तू दुसऱ्या परीक्षेतही पास झालास. बघ तुझ्या जखमादेखील लगेच बऱ्या झाल्या आहेत. नाहीतर मी कित्येकांना पाहिले आहे त्यांच्या जखमा पाण्याने आणखीन वाढून त्यांचा जागेवरच मृत्यू झालाय.
बघ आता या सुंदर रस्त्याने तू थेट वेताळबाबाच्या राजवाड्यात पोहचशील. तिथे भुतांचा दरबार भरलाय. जा तिथं आणि साऱ्यांची मने जिंक! माझा तुला आशीर्वाद आहे.” असं म्हणून आवाज बंद झाला. विनूच्या मनात विचारचक्र वेगाने फिरू लागले. आता या चक्रव्यूहातून सुटका नाही. भुताच्या राजवाड्यात जावंच लागणार. आता तिथं काय होणार याचा विचार करून विनूला घाम फुटला. पण तो लगेचच सावरला. आता आलोच आहे तर जाऊया समोरे म्हणून तो थोडा आत्मविश्वासाने भरभर चालू लागला.
त्याला दुरूनच वेताळाबाबाचा राजवाडा दिसू लागला. राजवाडा तीन मजली उंच होता. सगळीकडे पहारेकरी गस्त घालीत होते. त्यांचा वेश काळा होता आणि ते इकडे तिकडे हवेत तरंगत होते. दुरून त्यांचे पांढरे दात आणि लालभडक डोळे एवढेच दिसत होते. विनूने राजवाड्याला एक गोल फेरी मारली. राजवाड्याला एकूण बारा दरवाजे होते आणि त्या सर्व दरवाजांना तोरण म्हणून विविध प्राण्यांची मुंडकी लटकवलेली होती. त्याने सर्व दरवाजे नीट बघितले.
कुठे हत्तीची, कुठे वाघाची तर कुठे सिंहाची मुंडकी तोरण म्हणून लावली होती. मग एका दरवाजा समोर तो थबकला. कारण तिथे माणसांची मुंडकी लावली होती. तो तेथे उभा राहिला आणि काय आश्चर्य……. दरवाजा आपोआप उघडला. पण आतले दृश्य बघून डोळे पांढरे व्हायची वेळ विनूवर आली. भल्यामोठ्या सिंहासनावर वेताळबाबा बसला होता. त्याच्या डावी- उजवीकडे त्याचे मंत्रिमंडळ बसले होते आणि समोर हजारोंच्या संख्येने भुतगण बसले होते. विनूने आत प्रवेश करताच साऱ्या भुतांनी जोरदार कलकलाट केला.
मधल्या मोकळ्या जागेत उभा राहून विनू चौफेर बघू लागला. तोच एक खुर्ची तरंगत तरंगत छतातून खाली आली. “विनू बस त्या खुर्चीवर” असा आदेश वेताळबाबाने त्याला दिला. विनू मुकाट्याने खुर्चीवर जाऊन बसला. तोच खुर्ची वर उचलली गेली आणि गरगर फिरू लागली. इतकी जोरात की विनूला भोवळ येऊ लागली. तसा तो जोरात ओरडला थांबवा थांबवा! वेताळबाबाने विनूचा आवाज ऐकून हात वर केला अन् खुर्ची एकदम स्थिर झाली. विनूने डोळे उघडले आणि वेताळबाबाकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागला.
वेताळबाबा सांगू लागला, “विनू आम्ही इथला भुताचा राजा म्हणून तुझी निवड केली आहे. अभिनंदन तुझे” असे म्हणताच कितीतरी विचित्र आवाज विनूच्या कानावर पडले. वेताळबाबा पुढे म्हणाला, “अट फक्त एकच आहे ती म्हणजे तुला माझ्या मुलीबरोबर लग्न करावे लागेल!” तेवढ्यात वेताळबाबाची मुलगी पुढे आली. ती जख्खड म्हातारी होती. तिचा एक डोळा फुटला होता. कानाच्या पाळ्या खांद्यापर्यंत लोंबात होत्या. भले मोठे तीन-चार दात तोंडाच्या बाहेर पडले होते. तिची जीभ दोन फुटापर्यंत बाहेर येत होती. रंगाने काळीकुट्ट असणारी वेताळकन्या मात्र विनूला बघताच आनंदाने उड्या मारू लागली. हवेत तरंगू लागली. गोलांट उड्या मारू लागली. तिला बघून विनूची तर बोबडी वळली. तशाही अवस्थेत तो जीवाच्या आकांताने ओरडला.
“आई…. आई मी नाही लग्न करणार! नाही नाही!” तशी आई स्वयंपाक घरातून धावत बाहेर आली आणि विनूच्या डोक्यावर टपली मारून म्हणाली, “किती वेळा सांगितलं, अशी भुताखेताची पुस्तक वाचू नकोस म्हणून. किती घाबरले मी!” विनूचा जीव मात्र भांड्यात पडला आणि सगळे स्वप्न आठवून तो हसत बसला. तो का हसतोय हे मात्र आईला कळलेच नाही!
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी व्याकरण