आदरणीय शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी माझ्या आवडत्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. आणि तो विषय म्हणजे शाळेतील मधली सुट्टी!
मधल्या सुट्टीचं नाव काढताच ज्याला आनंद होत नाही असा विद्यार्थी सापडणं कठीणच! कारण मधली सुट्टी म्हणजे आनंद! मधली सुट्टी म्हणजे धमाल !
सगळ्यांसोबत डबा खाणं, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं, गाणी गाणं, हवं त्या बेंचवर बसणं, वर्गाबाहेरच्या गॅलरीत उभं राहणं, बाजूच्या वर्गाला भेट देणं, आपल्या आवडत्या बाईंना त्यांच्या रूममध्ये जाऊन भेटणं, वर्गात इकडे तिकडे धावणं, मित्रांसोबत पकडापकडी खेळणं, कधी कधी लुटूपुटूच्या मारामार्या करणं……
खरंच किती किती गोष्टी सांगू, किती करामती करतो आम्ही या मधल्या सुट्टीत. झटपट डबा खाऊन मैदानावर जायचं, लाल मातीत थोडा वेळ फिरायचं, फेरीवाल्याकडून चिंचा बोरं घ्यायची नाहीतर जवळच्या दुकानातून लेज, कुरकुरे घ्यायचे, ते मैत्रिणींसोबत वाटून खायचे. ज्या दिवशी डबा नसेल तेव्हा कॅटींनचा वडापाव खाण्याचा आनंद लुटायचा.
या पंधरा मिनिटाच्या मधल्या सुट्टीत आम्ही काय काय करतो याची गणतीच नाही. मला तर वाटतं शाळेतलं खरं शिक्षणं या मधल्या सुट्टीतच होत असतं. गप्पांतून नवनवे विषय कळतात. मित्रमैत्रिणींच्या आपण अधिक जवळ येतो. डबा वाटून खाण्याच्या सवयीने सहकार्याची भावना वाढीस लागते.
वर्गमित्रांसोबतचे रुसवे फुगवेदेखील याच मधल्या सुट्टीत संपून जातात. वेगवेगळे विषय शिकून मनाला आलेला थकवा या पंधरा मिनिटात निघून जातो. मन अगदी प्रसन्न होतं. खर्या गप्पा, खरं भेटणं याच वेळेत होतं. कारण शाळा भरण्याच्या वेळेला खूप घाई असते अन् शाळा सुटताना आपले पालक आपल्या बरोबर असतात. त्यामुळे गप्पा मारण्याची निवांत वेळ म्हणजे मधली सुट्टी!
अवघड विषय शिकून मुलांना लवकर थकवा येतो. यासाठी मन प्रसन्न करणारी मधली सुट्टी हवीच असे डाॅक्टर काका सांगतात! मी तर म्हणेन मधली सुट्टी दोन वेळा हवी. मग अधिक मजा, खूप धमाल आणि अभ्यासही खूप चांगला होईल हो की नाही मित्रांनो.
माझी ही विनंती आपले सर नक्कीच मान्य करतील अशी आशा मनात ठेवून आपल्याला खूप आवडलेले माझे हे भाषण मी संपवते.
जय माझी शाळा…… जय मधली सुट्टी !
- अधिक वाचा – मराठी भाषेचे महत्त्व
- अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
आपण शाळेत का जातो?
ह्या जगात जे काही ज्ञान भरलेले आहे ते कसे मिळवायचे याचे शिक्षण शाळेत दिले जाते. म्हणून आपण शाळेत जातो.
शाळेने मला काय दिले आहे?
शाळेने मला विवेकबुद्धी दिली. समाजात कसे वागायचे ते शिकवले. मला माझे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली.
शाळा आपल्याला आपल्या विकासात कशी मदत करते?
शाळेत जाऊन आपण गणित, भाषा हे विषय शिकतो. त्यामुळे आपली तर्कबुद्धी आणि संवादकला वाढीस लागते. ह्या दोन्ही गोष्टी जीवनात अतिशय महत्त्वाच्या आहेत. शाळा आपल्याला सहचर्य संस्कृती शिकवते.