नातं | Naate | नाते मराठी लेख | Marathi lekh

मानवी नात्यांची मोठी कमाल असते; नाही का! बरीचशी नाती आपोआप निर्माण होतात. अगदी निसर्गात दत्त असल्यासारखी ! ती निवडण्यात आपला काहीच सहभाग नसतो. तर काही आपण स्वतःहून निर्माण करतो जाणीवपूर्वक. म्हणूनच निसर्गदत्त नात्यांना रक्ताची नाती म्हणतात. नातं किती सुंदर शब्द आहे. किती नाजूक, प्रेमाने ओतप्रोत भरलेला.

नातं | Naate | नाते | Marathi lekh marathi sakha
नातं | Naate | नाते | Marathi lekh | marathi sakha

नातं | Naate | नाते मराठी लेख | Marathi lekh

मनाला आल्हाददायक बनवणारा. मानवी आयुष्यात नात्यांची कामगिरी किंवा महत्त्व खूपच मोलाचं असतं. माणसांचं जीवन फुलवायचं, त्याच्या जीवनात आनंदाची कारंजी उडवायची की, त्याचं जीवन वैराण वाळवंट बनवायचं हे नात्यांवरच अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ही नाती खूपच प्रभावीपणे काम करू शकतात. त्यांचे प्रेम, जिव्हाळा, कौतुक व्यक्तीला मोठे भावनिक बळ देतात.

आपल्या मागे कोणीतरी आहे याचा विश्वास त्याला असतो. पराभवात किंवा अपयशात ते आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील याची खात्री असलेला माणूस प्रगतीच्या शिखराकडे अल्पावधीत पोहोचतो. त्याचे आयुष्य आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि कौटुंबिक पातळ्यांवर अधिकाधिक समृद्ध होत जाते. पण ही नाती नीट सांभाळली नाहीत तिला जर संवादाचं वंगण आपण पुरवलं नाही तर ती गंजत जातात. त्यांच्यात गुंतागुंत वाढत जाते आणि मग जर का त्या गुंत्यात एखादा अडकला की मग संपलंच सगळं! मग जी नाती इतर वेळी आनंददायी उत्साहवर्धकतेचे काम करतात, तीच नाती मनामनात विष पेरू लागतात.

आयुष्याच्या चिंधड्या उडवतात. जीवन वैरण बनवून टाकतात. सुख, शांती आणि समाधान हरवून बसतात. मग ते नातं आई-वडील, मुलाचं असो व पती-पत्नीसह, भावा- बहिणीचं व भावा-भावांचं असो व इतर कोणतंही! या नात्यांचं विशेष हे असतं की ती कधी संपत नाहीत. ते कधीच संंपता संपत नाही. नातं एकदा चिकटलं की ते कायमचं! आणि म्हणूनच ते जपावं लागतं अगदी निगुतीनं! त्याला संवादरूपी वंगण लागतं. त्यासाठी त्याग करावा लागतो. तडजोडीने ते अधिक मजबूत बनतं आणि दीर्घ काळ टिकण्यास मदत होते.

ज्या माणसाला या नात्यांची ताकद अनुभवयास मिळते ते खरेच भाग्यवान असतात. कारण त्यांच्या मदतीने तो आपली प्रगती साधत असतो. पण काही महाभाग आपल्या जीवनात नात्यांऐवजी फक्त पैशाला, संपत्तीला, धनाला महत्त्व देतात. त्यांचा स्वतःच्या वैयक्तिक, बौद्धिक आणि शारीरिक ताकदीवर खूपच आंधळा विश्वास असतो. त्यामुळे तात्कालिक यशाच्या प्रभावाखाली त्यांना नात्यांचा विसर पडतो. ते प्रचंड मेहनत करतात. पैसा, प्रसिद्धी मानमरातब मिळवतात.

आपल्या उमेदीच्या काळात ज्या कोणी मदत केली, ज्या कोणाचं सहकार्य मिळालं, अगदी कळत नकळत मदत करणारी अनेक माणसं विविध नात्याने आपल्याशी गुंफलेली असतात. त्यांचे योगदान तो विसरून जातो आणि यशाच्या धुंदीत इतरांकडे दुर्लक्ष करतो. पण एक वेळ अशी येते की एका विशिष्ट टप्प्यावर त्याला माणसांची; नव्हे नव्हे नात्यांची गरज वाटू लागते. यशात सहभागी होण्यासाठी, दुःखात सांत्वनासाठी त्याला मानसिक आधारासाठी नाती हवी अशी वाटू लागतात.

पण यशाच्या मागे धावताना तो जर का नात्यांना विसरला असेल तर मग एकाकी आयुष्य जगण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच उरत नाही. म्हणून सांगावसं वाटतं….. नाती जपा, त्यांचे निगुतेने संवर्धन करा. नियमितपणे संवाद चालू ठेवा. तर नात्यांचा रंगीबेरंगी कॅलिडोस्कोप तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनुभवास मिळेल. अन्यथा नाती म्हणजे एक कोळ्यांची जाळी बनतील आणि त्यात तुम्ही गुरफटून जाल कायमचेच!

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी लेख

Leave a comment

error: